मी, स्वाइन फ्लू..
नमस्कार, मी स्वाइन फ्लू. तुम्ही मला नावानं ओळखत आहातच. पण माझी कधी भेट होऊ नये असंच प्रत्येकाला मनातून वाटत आहे. कॉलरा, पटकी, प्लेग, देवी आणि अलीकडे डेंगी अशा विविध अवतारांत मी पृथ्वीतलावर अवतरलो होतो. भारतात मी अवतरलो तो थेट पुण्यातच. मी पुण्यातच का अवतरलो, या बद्दल पुण्यातल्या लोकांत मोठे कुतूहल आणि संतापही आहे. ‘याला दुसरं गाव दिसलं नाही का’ असा प्रचंड संतापयुक्त प्रश्न मला पुण्यात पावला पावलावर, क्षणोक्षणी ऐकायला मिळतो आहे. मी पुणं का निवडलं, कारण पुण्यात जी गोष्ट स्वीकारली जाते ती उभ्या महाराष्ट्रात स्वीकारली जाते असं पुणेकर अभिमानाने सांगत असतात. ‘कृपया आहेर आणू नयेत’ची चळवळ पुण्यातच चालू झाली. आता ती सगळीकडे पसरत आहे. पुणेकरांना आपलंसं केलं तर महाराष्ट्रात पाय पसरायला वेळ लागणार नाही, असा धूर्त विचार मी केला. पुण्यात अवतरण्याने माझी जशी दखल घेतली जाईल तशी दखल मी अन्य ठिकाणी अवतरलो असतो तर घेतली गेली नसती हेही मला ठाऊक झाले होते. वर्षा-दोन वर्षापूर्वी सोलापूर, सांगली, मराठवाडय़ात आमच्या भावकीतला चिकनगुनिया अवतरला होता. त्याने त्यावेळी अनेक विकेटही घेतल्या होत्या. पण ना पेपरवाल्यांनी त्याची म्हणावी तशी दखल घेतली ना चॅनेलवाल्यांनी. स्थानिक छोटय़ा पेपरांत दोन-चार दिवस बातम्या छापून आल्या. बस्स. पुण्यात अवतरल्यामुळं मला अशी प्रसिद्धी मिळते आहे की विचारू नका. दररोजच्या पेपरची पान एकची जागा माझ्या नावानं बुक आहे. चॅनेलवाल्यांना तर कोलीतच मिळालंय. पुण्यातल्या पेपरवाल्यांनी उठवलेला जबरदस्त आवाज बघून केंद्रीय आरोग्यमंत्र्याला संसदेत निवेदन करावं लागलं. अशी प्रसिद्धी मी बीड, नांदेडमध्ये अवतरलो असतो तर कधीच मिळाली नसती. याचं कारण पुणेकरांचं सगळं वेगळंच आहे. पुण्यापासून ३०-४० किलोमीटरवरच्या सासवडजवळ हंडाभर पाणी मिळवण्यासाठी लोकांना दोन-दोन मैल पायपीट करावी लागते. पण त्याची चार ओळीची बातमी कधी छापून येत नाही. पण परवा पुण्यात एक वेळ पाणी येणार म्हटल्यावर असा काही कालवा झाला की खुद्द वरुणदेवही घाबरला आणि पुणेकरांच्या पाण्याची गरज भागवण्याइतका बरसून गेला. कालचं शिळं पाणी प्यावं लागणार म्हणून अनेकांचं बीपी वाढलं होतं, तर अनेकांना बोअरच्या पाण्यानं आपल्या चारचाक्या, दुचाक्या धुवाव्या लागणार म्हणून टेन्शन आलं होतं. महाराष्ट्रात अनेक गावांत आठ-आठ तास वीज नसते. पण पुण्याला २४ तास वीज हवी म्हणून खास पॅटर्न तयार केला गेला. वीज मिळते आहे म्हणून कशीही वापरली जाते. चार-पाच मजले उतरायचेही इथल्या लोकांच्या जीवावर येतं. तेवढय़ा पायऱ्या आपण उतरलो तर जगबुडी होईल असं इथल्या लोकांना वाटतं. चार-पाच मजले उतरण्यासाठीही लिफ्ट तळमजल्यावरून वर बोलावतात, अशी इथली ‘स्पेशल’ लोकं आहेत. म्हणूनच आपली टेरर निर्माण करायची असेल तर पुण्याइतकी योग्य जागा शोधून सापडणार नाही हे मी ओळखलं होतं. माझा अंदाज किती खरा ठरला हे दिसतं आहेच.
खरं तर मी पुण्यात यायला बिचकत होतो. तिथल्या प्रदूषणात आपला टिकाव लागणार नाही असं मला वाटत होतं. इथले लोक अजिबात चालत नाहीत. टिळक रोडवरचा माणूस फुले मंडईतही सॅंट्रो, अल्टो किंवा हिरो होंडा घेऊन जातो. ‘आपके पॉंव बहुत हसीन है, इन्हें जमींपर मत रखिये’, असं ‘पाकिजा’ तल्या राजकुमारप्रमाणं पुणेकरांना कोणीतरी सांगितलं आहे की काय कोणास ठाऊक? इतक्या गाडय़ांच्या धुरामुळं आपल्या अंगावर रॅश उठेल अशी भीती माझ्या मनात होती. एकदाचा मी इथं आलो. पुणेकर कुणाला तरी घाबरतात हे बघून मला अत्यंत आनंद झाला. सगळ्या जगात ट्रॅफिक सिग्नलला किती मान आहे. एका लाल दिव्यासरशी शेकडो मोटारी एका क्षणात आहे त्या जागेवर थांबतात. पण तोच सिग्नल इथं बिच्चारा होऊन जातो. त्याच्याकडे कुणी बघतच नाही. घाबरायचं तर लांबच राहिलं. मला मात्र सगळे जाम घाबरलेत. सगळीकडे मास्कधारकांच्या फौजा दिसताहेत. घरोघरी माझीच चर्चा आहे. अनेकांनी बराक ओबामालाच इ मेल करून मला एक्सपोर्ट केल्याबद्दल धारेवर धरलंय असं कळतंय. माझ्यापासून कसं वाचता येईल याचा विचार चालू आहे. त्यामुळं मला इथला मुक्काम लवकरच हलवावा लागणार असं दिसतय.
0 comments:
Post a Comment